प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मोढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:26 AM2021-02-05T06:26:45+5:302021-02-05T06:26:45+5:30
पारनेर : पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हंगा गावचे प्राथमिक शिक्षक चंद्रकांत मोढवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ...
पारनेर : पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हंगा गावचे प्राथमिक शिक्षक चंद्रकांत मोढवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष खामकर यांची फेरनिवड करण्यात आली. जानेवारी महिन्यात सदिच्छा मंडळातील काही कार्यकर्ते गुरुमाऊलीत दाखल झाले होते. त्याअनुषंगाने सदिच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत मोढवे हे शिक्षक संघाचे अध्यक्ष झाले आहेत. प्राथमिक शिक्षक बँकेच्या स्थापनेपासून एक-दोन अपवाद वगळता कायम सदिच्छा मंडळाचे शिक्षक बँकेवर वर्चस्व राहिले आहे. मंडळाने बँक स्वभांडवली बनवली आहे. पारनेर तालुक्यातून सदिच्छा मंडळात फूट पडून गुरुमाऊली मंडळ तयार झाले होते. मोढवे हे आमदार नीलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पारनेर व नगर तालुक्यात सर्व शिक्षकांशी त्यांचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते संघटनेत सक्रिय आहेत. यापूर्वी ते सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात.
चंद्रकांत मोढवे हे शिक्षकांना अडचणीच्या काळात नेहमीच मदत करतात शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारा शिक्षक नेता, अशी त्यांची ओळख आहे. राज्याध्यक्ष राजाराम वरुटे शिक्षक नेते विष्णू दादा खांदवे, शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, प्रदीप खिलारी, जिल्हाध्यक्ष माधव हासे, मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, कार्याध्यक्ष दादा वाघ यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
पारनेर तालुका शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ नूतन कार्यकारिणी : शिक्षक संघ अध्यक्ष- चंद्रकांत मोढवे, कार्याध्यक्ष- विकास खरमाळे, सरचिटणीस- राजू खोडदे, कोषाध्यक्ष- अंबादास कोरडे, कार्या. सरचिटणीस- प्रभाकर मंचरे. प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळ कार्यकारिणी अध्यक्ष- संतोष खामकर, कार्याध्यक्ष- संतोष दिवटे, सरचिटणीस- प्रकाश केदारी, कोषाध्यक्ष- इंद्रभान ठाणगे, कार्या. चिटणीस- गोरक्ष लोखंडचुर, उपाध्यक्ष- बाळासाहेब नवले.