दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेत अटीतटीची लढाई, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 04:25 PM2022-09-06T16:25:23+5:302022-09-06T16:26:08+5:30
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर महापालिका निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेनंही आज बैठक घेतली, त्यातच, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यावर आपलाच हक्क दाखवला असून सध्या हा विषय कागदांत अडकला आहे. या वादावर इतरही पक्षांकडून भाष्य केलं जात आहे. आता, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात भाष्य करताना स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याबाबत, दसरा मेळाव्याचा विषय प्रलंबित असून आम्ही परवानगी मागितल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. दुसरीकडे ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते, शिवतिर्थवर दसरा मेळावा आमचाच होईल, असे ठामपणे सांगत आहेत. चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट शब्दात बोलणे टाळले.
दसरा मेळाव्याबाबत सध्या अटीतटीची लढाई सुरू असताना याबाबत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले की, हा दोन पक्षाचा खासगी विषय आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही. नगर इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील नियोजित इमारतीचे भूमिपूजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका मांडली.
नव्या धोरणाला महाविकास आघाडीकडून खोडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरणाची देशभर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, मागील अडिच वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राशी असहकार पुकारून त्याची अंमलबजावणी केली नाही. आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू, असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.