नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणाचे दोषारोपपत्र आज होणार दाखल
By Admin | Published: May 11, 2017 02:56 AM2017-05-11T02:56:51+5:302017-05-11T02:56:51+5:30
नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी ( दि. ११) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार असून, यामध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी ( दि. ११) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार असून, यामध्ये आरोपींची संख्या वाढणार असल्याचे समजते़ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग हे दोषारोपपत्र दाखल करणार आहे़
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार २३ एप्रिल रोजी राज्य सरकारने पांगरमल दारूकांड प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला़ सीआयडीचे कोल्हापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा तपास पूर्ण करण्यात आला़ मागील सहा दिवसांपूर्वी सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दोन दिवस नगरमध्ये येऊन या प्रकरणाचा आढावा घेतला़ या प्रकरणाला १२ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असल्याने न्यायालयात गुरूवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़
पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत असलेल्या भाग्यश्री मोकाटे व मंगल आव्हाड यांच्यावतीने कार्यकर्ते व मतदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते़ या पार्टीत विषारी दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला़ ही दारू येथील जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होत असल्याचे समोर आले़ त्यानंतर विषारी दारूमुळे नेवासा तालुक्यातील १, नगर तालुक्यातील कौडगाव येथील २ तर दरेवाडी येथील दोन अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे़ या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास करून १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ १९ पैकी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे फरार आहे़ तर राजू बुगे याचा अपघातात मृत्यू झाला आहे़