स्वस्त धान्य दुकानदाराची रोहित पवार यांनाच उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:25 PM2020-05-04T22:25:04+5:302020-05-04T22:25:13+5:30

जामखेड (जि. अहमदनगर) : दुकान बंद का ठेवले असे विचारले असता एका स्वस्त धान्य दुकानदाराने चावी नसल्याची खोटी सबब सांगत आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाच उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार राजुरी (ता. जामखेड) येथे सोमवारी दुपारी घडला. दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने तहसीलदारांनी त्या दुकानदारास ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Cheap grain shopkeeper Rohit Pawar's vague answers | स्वस्त धान्य दुकानदाराची रोहित पवार यांनाच उडवाउडवीची उत्तरे

स्वस्त धान्य दुकानदाराची रोहित पवार यांनाच उडवाउडवीची उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड (जि. अहमदनगर) : दुकान बंद का ठेवले असे विचारले असता एका स्वस्त धान्य दुकानदाराने चावी नसल्याची खोटी सबब सांगत आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाच उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार राजुरी (ता. जामखेड) येथे सोमवारी दुपारी घडला. दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने तहसीलदारांनी त्या दुकानदारास ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार रोहित पवार यांच्याकडे राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी गेल्या होत्या. सोमवारी खर्डा येथील टंचाईसंदर्भातील बैठक संपल्यानंतर पवार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पुरवठा अधिकारी नितीन बोरकर यांसह राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलीत स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट दिली. त्यावेळी दुकान बंद होते. त्यांनी स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी रामभाऊ राळेभात यांना बोलावून घेतले. त्यांना दुकान उघडण्यास सांगितले. त्यांनी चावी नसल्याची खोटी सबब सांगितली. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. ते चावी आणत नसल्याने पवार यांनी कुलूप तोडण्याच्या सूचना केल्या. दुकानाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा आढळून आला. मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. त्यावेळी पवार व अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी काढली.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी धान्य दुकानदार शहाजी राळेभात यास तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटींचा खुलासा ४८ तासात न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पत्र दिले आहे.
--------

तपासणीत आढळल्या अनेक त्रुटी
महसूलच्या पथकाने तेथील धान्याची तपासणी केली. यात एप्रिल व मे महिन्याचा धान्य दुकानदारास शासनाकडून गहू १०६.५० क्विंटल, तांदूळ १५१.५० क्विंटल, साखर १.९० क्विंटल अंत्योदय लाभार्थ्यांसाठी देण्यात आली होती. त्यापैकी धान्य वाटप केल्यानंतर दुकानात सहा क्विंटल गहू, तांदूळ १५.७९ क्विंटल व अंत्योदयची साखर ७५ किलो साठा जास्त आढळून आला. त्यानुसार धान्य दुकानदाराने पॉस मशीनवर लाभार्थ्याच्या स्वत:च्या अंगठ्याने पावत्या काढून धान्य वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानदाराने लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले, असे अहवालात नमूद केले आहे. याशिवाय दुकानाचा वजनकाटाही प्रमाणित केलेला नाही. दुकानात कोणतेही दरपत्रक, माहिती फलकही दिसून आला नाही.
---
शेवगाव-पाथर्डीत रेशन दुकाने सील, कोरोनाचा ग्राऊंड रिर्पोट (हॅलो एकवर)
-----------------
फोटो--०४रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी सोमवारी जामखेड तालुक्यातील राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाची झाडाझडती घेतली.

Web Title: Cheap grain shopkeeper Rohit Pawar's vague answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.