स्वस्त वाळूमुळे फ्लॅटचे दर कमी होतील - राधाकृष्ण विखे
By शिवाजी पवार | Published: May 2, 2023 04:23 PM2023-05-02T16:23:42+5:302023-05-02T16:24:14+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यात ६०० रुपये ब्रासने वाळू उपलब्ध झाल्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे घरांच्या किमतीही कमी होऊन सामान्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोघा जणांना वाळूची विक्री करण्यात आली. त्यानंतर विखे हे पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, पूर्वी सहा हजार रुपये ब्रासने वाळू विकली जात होती. त्यामुळे बांधकामाचे दर गगनाला भिडले होते. सर्वसामान्य माणसाला घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदी करणे कठीण झाले होते. आता वाळूचे भाव ६०० रुपये ब्रासपर्यंत खाली आल्याने फ्लॅटचे दर कमी होतील. यासाठी आपण राज्यातील इंजिनियर, बिल्डर यांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत.
यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, नायगावचे सरपंच राजाराम राशिनकर आधी उपस्थित होते.