स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे
By Admin | Published: August 9, 2016 11:57 PM2016-08-09T23:57:27+5:302016-08-10T00:24:37+5:30
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या आश्वासानंतर
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या आश्वासानंतर मंगळवारी जिल्ह्यातील दुकानदारांनी संप मागे घेतला़ त्यामुळे जिल्ह्यातील धान्य पुरवठा सुरळीत झाला असून, दुकानांत धान्य पोहोच केले जाणार आहे़
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्री परवाना धारकांनी १ आॅगस्टपासून बंद पुकारला होता़ त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून धान्य वाटप बंद होते़ या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ या बैठकीत शेवगाव येथील संघटनेचे देविदास देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीनंतर संप मागे घेतल्याची घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या आयोजित मेळाव्यात केली़ स्वस्त धान्य दुकानदार विके्रता संघाचे शहराध्यक्ष प्रकाश हापसे, उपाध्यक्ष बार्शीकर, बाळासाहेब दिघे, निलेश दारुणकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते़
बैठकीदरम्यान पारदर्शी कारभार हा शासनाचा हेतू आहे़ बायोमेट्रीक पद्धतीमुळे धान्य वितरणात पारदर्शकता येणार असून, गरजूंना धान्य मिळणार आहे़ त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळते़ त्यात वाढ व्हावी, यासाठी सरकारने पावले उचलली असून, मानधन वाटपाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दुकानदारांना दिले़ शिंदे यांच्या झालेल्या चर्चेनंतर शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी संप मागे घेतला असून, धान्याचे चलन भरण्यास सुरुवात केली आहे़ पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार असून, तूरडाळीचेही शिधापत्रिकेवर वाटप करण्यात येणार आहे़
जिल्हा पुरवठादाराकडून तूरडाळीचा पुरवठा तालुक्यातील गोदामात पोहोच करण्यात येणार आहे़चलन भरल्यानंतर तूरडाळ दुकानदारांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले़
(प्रतिनिधी)