मद्याचे उत्पादन तपासणार
By Admin | Published: April 29, 2016 11:22 PM2016-04-29T23:22:52+5:302016-04-29T23:30:18+5:30
अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे.
अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे. मद्याचे उत्पादन जैसे थे आढळल्यास न्यायालयीन अवमानाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी या कारखान्यांना दिला.
मद्यनिर्मितीच्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून, यामुळे वाचणारे पाणी दुष्काळी भागाला पुरविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव तसेच पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीुपरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ जिल्ह्यात मद्यनिर्मिती करणारे १० तर आसवनीचे ११ कारखाने आहेत़ कारखान्यांतील मद्य व आसवनी निर्मितीसाठी दररोज १४ कोटी ४० लाख ३७ हजार ८९७ लीटर पाण्याचा वापर होतो़ यापैकी निम्मे पाणी कारखान्यांनी स्वत:च पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन हे पाणी कोणत्या गावांना पुरवायचे याचा निर्णय कारखान्यांनी घ्यावयाचा आहे. धरणाच्या पाण्यासोबतच कारखान्यांना स्वत:च्या अथवा इतर स्त्रोतांचे पाणी देखील वापरता येणार नाही. पाण्याची कपात झाल्यानंतर मद्याचे उत्पादनही आपोआप घटून ते निम्म्यावर यायला हवे. त्यामुळे प्रशासन उत्पादनाची आकडेवारी तपासून खातरजमा करणार आहे. घट न आढळल्यास कारखान्यांनी पाणी वापरले असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
(प्रतिनिधी)
एमआयडीसीचे पाणी पिण्यासाठी
नगरसह सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो. या उद्योगांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात पहिल्या टप्प्यात २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे वाचलेले पाणी गरजेनुसार दुष्काळग्रहस्त गावांना उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र मुळा पाटबंधारे विभागाने एमआयडीसी प्रशासनास दिले आहे. सध्या नागापूर, सुपा आणि पांढरीपूल येथील एमआयडीसीच्या उपकेंद्रातून परिसरातील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. म्हणजेच एमआयडीसीच्या पाण्यातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. याशिवाय २० टक्क्यांपर्यंतचे पाणी यापुढील काळात पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागापूर, सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना दररोज २० टक्के पाणी कमी मिळणार असल्याने ऐन दुष्काळात त्यांना पाण्याची टंचाई भासणार आहे.
जिल्ह्यातील मद्य व आसवनी प्रकल्पांचे दररोज ७ कोटी लीटर पाणी आता पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.