‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2016 11:41 PM2016-05-03T23:41:39+5:302016-05-03T23:49:32+5:30

अहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़

Checking the works of 'Jalakari' | ‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

खर्चाची घेणार माहिती : राज्य लेखा परीक्षण समितीकडून कामांची पाहणी
अहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़ जिल्ह्यातील कामांना भेटी देवून कामाची गुणवत्ता, त्यापासून होणारा लाभ आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती घेणार असल्याने संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहे़
राज्य लेखा परीक्षण विभागाची त्रिसदस्यीय समिती नगरमध्ये दाखल झाली आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त’च्या कामांची माहिती मंगळवारी समिती सदस्यांना दिली़
कामांची माहिती घेऊन ही समिती जिल्ह्यातील निवडक गावांना भेटी देणार आहे़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता ही समिती तपासणार आहे़ तसेच गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात कामे झाली का? झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे़
शेतकऱ्यांचे याबाबत काय म्हणणे आहे, याची माहिती घेऊन समिती अहवाल तयार करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत़ त्याचे समितीकडून निराकारण करण्यात येणार आहे़
मागील वर्षी जिल्ह्यात २७९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली होती़
निवड झालेल्या गावांत १३ हजार १३८ कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्यापैकी १२ हजार ८७८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६० कामे प्रगतिपथावर आहेत़ त्यावर १७३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत़ श्रीरामपूर तालुका ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आघाडीवर आहे़ सदर तालुक्यातील २५४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ यापैकी निवडक कामांची पाहणी लेखा परीक्षण समितीकडून करण्यात येणार आहे़
(प्रतिनिधी)
त्रयस्थ संस्थेकडून कामांची चौकशी
जिल्हा नियोजन समितीकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती करण्यात आली आहे़ संस्थेच्या पथकाने जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केले आहेत़ जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात अहवाल मागविला आहे़
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २७९ गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत़ या कामांची तपासणी करण्यासाठी राज्य लेखा परीक्षण समिती दाखल झाली आहे़ समितीकडून काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी करणार आहे़
- भाऊसाहेब बऱ्हाटे,
जिल्हा कृषी अधीक्षक

Web Title: Checking the works of 'Jalakari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.