शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम अजूनही उपमहापौरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:58 PM2018-02-17T12:58:17+5:302018-02-17T13:14:58+5:30
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरांपर्यंत पोहोचवलाच नाही.
अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरांपर्यंत पोहोचवलाच नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्याच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खा. दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. छिंदम याने दिलेल्या राजीनाम्याची प्रतही माध्यमांकडे पाठविण्यात आली होती. मात्र छिंदम याने पदाचा राजीनामा दिला असल्याचे शहर जिल्हाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. प्रत्यक्षात छिंदम याने महापौरांच्या नावे राजीनामा सादर करणे आवश्यक होते. छिंदम याने दिलेला पदाचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते. २४ तास उलटून गेल्यानंतरही शनिवारी महापालिकेत राजीनामा धडकलाच नाही. त्यामुळे खा. गांधी यांनी केलेली घोषणा अजुन तरी प्रत्यक्षात आली नसल्याचे दिसते.
दरम्यान आता खा. दिलीप गांधी यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गांधी विरोधी गटाने लावून धरली आहे. त्यामुळे खा. गांधी यांच्या पदालाही धोका निर्माण झाला आहे.