मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरू
By Admin | Published: April 26, 2016 11:14 PM2016-04-26T23:14:11+5:302016-04-26T23:24:19+5:30
अहमदनगर : शहरातील मटका-तिरट खेळणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.
अहमदनगर : शहरातील मटका-तिरट खेळणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. सोमवारी सायंकाळी राबविण्यात आलेल्या छापासत्रात १२ मटका अड्ड्यांवर कारवाई केली. यामध्ये अड्डा चालवून मटका खेळविणाऱ्या पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मटका खेळण्याच्या साहित्यासह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
‘लोकमत’च्या सोमवार (दि. २५) च्या अंकात ‘मटका सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची आॅफर’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. शहरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांकडे शहरातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहर परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांना मटका अड्ड्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आणि तब्बल १२ ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. यामध्ये कोतवाली पोलिसांनी तीन ठिकाणी, तोफखाना पोलिसांनी आठ ठिकाणी तर कॅम्प पोलिसांनी एका ठिकाणी कारवाई केली.
बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या कंपाऊंडलगत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून संतोष झुंबर गाडे (रा. चिचोंडी पाटील) याला अटक केली. त्याच्याकडून ६६० रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले. कल्याण रोडवरील बालाजी सोसायटीजवळ छापा टाकून सूर्यकांत प्रभाकर बिलाड याला अटक केली. या अड्ड्यावर २ हजार रुपये रोख जप्त केले. इम्पिरिअल चौकात शौकत सय्यद याला अटक करून पाचशे रुपये जप्त केले. तो मुंबई मटका चालवित होता.
तोफखाना पोलिसांनी सावेडी नाका येथे छापा टाकून दीपक बाळासाहेब रेंगदळ याला अटक केली. कल्याण मटक्यावर लावलेले ५७० रुपये जप्त केले. नेप्ती नाका चौकातील टपरीजवळ भाऊ माणिकराव वाघमारे (वाघगल्ली, नालेगाव) याला १ हजार २३० रुपयांसह अटक केली. अमरधाम परिसरात अजीज अब्दूल पठाण याला एक हजार रुपयांसह ताब्यात घेतले. बालिकाश्रम रोडवरील नीलक्रांती चौकात संजय पोपटलाल गुंदेचा (रा. बागडे मळा) याला १ हजार १४० रुपयांसह अटक केली. सर्जेपुरा चौकात नाना वडेवाले यांच्या टपरीजवळ अश्पाक शब्बीर शेख (रा. बेलदार गल्ली) याला ३७० रुपये आणि मटक्याच्या साहित्यासह अटक केली.
कोंड्यामामा चौकात सत्तार गफार शेख (रा. कोठला) हा लोकांकडून पैसे घेवून जुगार लावत होता. त्याच्याकडून ४७० रुपये जप्त केले. भिस्तबाग चौकात म्हसोबा मंदिराजवळ शिरीष शरदचंद्र शेटे (रा. एमआयडीसी) हा मटका खेळविताना आढळून आला. २९० रुपयांसह साहित्य जप्त केले.
कल्याण आणि मुंबई मटका तेजीत
शहरात आणि ग्रामीण भागात कल्याण आणि मुंबई मटका सध्या तेजीत आहे. पूर्वी एक मटका सकाळी, तर दुसरा मटका दुपारनंतर लागायचा. आता दोन्ही मटके दिवसभर खेळले जात असून काहीवेळानंतर त्याचे निकाल येतात. त्यामुळे दिवसभर छुप्या पद्धतीने मटका खेळविला जातो. टपरी, हॉटेल, मंदिर भिंतीच्या आडोशाला थांबून मटका सुरू होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये तिरट हा प्रकारही तेजीत होता. अनेक दिवसांपासून खेळविला जात असलेल्या मटका अड्ड्यांवर अचानक छापे सुरू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.