घोडे, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची शोभायात्रा
By साहेबराव नरसाळे | Published: April 21, 2023 05:02 PM2023-04-21T17:02:07+5:302023-04-21T17:03:51+5:30
सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन या शोभायात्रेस प्रारंभ झाला.
अहमदनगर : भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेसाठी शहरातून शुक्रवारी (दि.२१) पारंपारिक वाद्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. उंट, घोडे, बैलगाडी, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन या शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेसाठीचे प्रथम बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा दक्षिणमुखी हनुमान चरणी ठेवण्यात आली. यावेळी स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा आदी उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सायंकाळी ६ वाजता होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यासह इतर मल्लांची उपस्थिती होती. दोन व्हेंन्टेज कारमध्ये मल्लांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्जेपूरा, कापडबाजार, माणिक चौक, पंचपीर चावडीमार्गे ही शोभायात्रा निघाली. मिरवणुकीचा समारोप विशाल गणपती प्रांगणात झाला.