जबरी चोरी, ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात छिंदम बंधुंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:14+5:302021-09-16T04:27:14+5:30
अहमदनगर : भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे ...
अहमदनगर : भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने नगर शहरातून अटक केली. या दाेघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.
शहरातील दिल्लीगेट येथील टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रीपाद व श्रीकांत यांच्यासह इतर ३० ते ४० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. छिंदम बंधुंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै, २०२१ रोजी दुपारी दिल्लीगेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ करत, त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रुपये हिसकावून घेतले, तसेच टपरी जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकली, अशी फिर्याद बोडखे यांनी दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर छिंदम बंधुंसह इतर दोघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. येथे मात्र त्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. त्यानंतर, त्यानी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने या गुन्ह्यातील दोघा आरोपींना जामीन दिला. मात्र, श्रीपाद व श्रीकांत यांचा अर्ज फेटाळून लावला. बुधवारी सकाळी श्रीपाद व श्रीकांत दिल्ली गेट येथे असल्याची माहिती उपअधीक्षक ढुमे यांना मिळाली होती. त्यानंतर, पथकाने तेथे जाऊन त्यांना अटक केली.