शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमला जेलमधील कैद्यांनी बदडलं; दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:42 PM2018-02-17T12:42:49+5:302018-02-17T13:13:39+5:30
भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला सकाळी ९ वाजता सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मारहाणीच्या घटनेच मात्र कारागृह प्रशासनाने इन्कार केला आहे.
अहमदनगर: भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला सकाळी ९ वाजता सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नसला तरी सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे पत्र न्यायालयाला दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छिंदम याला सबजेलमधून हलवावे असे पत्र सबजेल प्रशासनाने न्यायालयाला दिले आहे.
निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. छिंदमच्या जीविताला धोका असल्यानं नगर सबजेलहून हलवण्याचा कारागृह प्रशासनाचा निर्णय आहे.
छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलीसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता छिंदमला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला १ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ के़ एम़ कोठुळे यांनी छिंदमच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी छिंदम याच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी कोणी वकिल नव्हता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान छिंदम याला सबजेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे छिंदमला कैद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छिंदम याची लवकरच नगर बाहेर रवानगी होणार असल्याचे समजते.