छिंदमची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:30 PM2018-03-01T19:30:18+5:302018-03-01T19:31:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सलग सुट्यांमुळे पोलीस त्याला न्यायालयात हजर करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाने ही मुदतवाढ दिली. आता १४ दिवसांनंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
छिंदम याने १६ फेब्रुवारीला महानगरपालिकेच्या कर्मचा-याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचे पडसाद शहरात उमटल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच दिवशी रात्री अटक केली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले होते.
त्याच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि. २८ फेब्रुवारीला संपत असल्याने त्याला १ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार होते. परंतु होळी, धुुलीवंदन या सलग सुट्यांमुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर न करता न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ देण्याचा विनंती अर्ज सादर केला. त्यामुळे आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर दि. १५ मार्चला छिंदमला न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, छिंदमचे वकीलपत्र अद्याप कोणत्याच वकिलाने घेतलेले नाही. पोलिसांनी छिंदमविरोधात समाजात तेढ निर्माण करणे हे वाढीव कलम लावल्याने पुढील तारखेस पोलिसांकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते.