एक फेब्रुवारीपासून कुकडीचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:14+5:302020-12-30T04:27:14+5:30
श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी पार पडली. यावेळी शेतीसाठी कुकडीचे ...
श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी पार पडली. यावेळी शेतीसाठी कुकडीचे आवर्तन १ फेब्रुवारीपासनू तर घोड धरणाचे आवर्तन १० फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, खा. रणजीतसिंह निंबाळकर, आ. रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार, संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, प्रशांत कडुसकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला कुकडी व घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टाॅकमधील (मृतसाठा) पाणी ग्राह्य न धरता कुकडीच्या आवर्तनाचे नियोजन करावे लागणार आहे. यंदा पिंपळगाव जोगे धरण शंभर टक्के भरले नाही. पिंपळगाव जोगेच्या डेड स्टाॅकमधील पाणी उन्हाळ्यात येडगावमध्ये सोडले तर पिंपळगाव जोगेमधील आवर्तनावर गंभीर परिणाम होण्याची धोका आहे.
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार केला तर ‘घोड’चे शेतीसाठी तीन तर कुकडीचे दोन आवर्तन सुटण्याची परिस्थिती असली तरी डिंभेतील पाणी मिळणार नाही. त्यामुळे कुकडीचे एक आवर्तन मिळण्याची शक्यता आहे.
---
डिंभे-माणिकडोह बोगदा कधी होणार?
भविष्यात पिंपळगाव जोगेचे पाणी येडगावमध्ये सोडण्यास विरोध होणार आहे. त्यामुळे डिंभे-माणिकडोह बोगदा जोडप्रकल्पाचे काम तातडीने हाती घेतले तर नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेती वाचणार आहे. अन्यथा, पिकांचा कोळसा अटळ आहे. डिंभे-माणिकडोह बोगदा जोड प्रकल्पाचा खर्च १२० कोटींवरून ३०० कोटींवर गेला आहे.