मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:49 PM2023-05-31T16:49:00+5:302023-05-31T16:49:29+5:30
अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली. ते चौंडी येथे एका सभेला संबोधित करताना बोलत होते. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा 'अहिल्यानगर' म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज अहिल्यादेवींची सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे बोलत होते. तिथे त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव 'अहिल्यानगर' करणार असल्याचे जाहीर केले. अहिल्यानगर असं नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे. तसेच हे नामांतर झाल्यामुळे नगर जिल्ह्याचा मान देखील हिमालयाएवढा होणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उस्मानाबाद आणि औरंगाबाद या जिल्ह्याचं नामकरण 'धाराशीव' आणि 'छत्रपती संभाजीनगर' असं करण्यात आलं. या दोन जिल्ह्यांचं नामकरण केल्यानंतर सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचंही नामांतर करण्याचा मोठा निर्णय घेतला.
अहिल्यादेवींचं नाव हिमालयाएवढं - शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव हिमालयाएवढं असून आता या जिल्ह्याचा मान देखील हिमालयाएवढा होणार आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे आम्ही आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालो हे आमचे भाग्य समजतो. ज्या लोकांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही २० दिवसात सत्तेतून घालवण्याचे काम केलं, असं मुख्यमंत्री शिंदेंनी अधिक सांगितलं.