नगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:04 AM2018-05-07T04:04:32+5:302018-05-07T04:05:08+5:30
दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरुन पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
अहमदनगर - दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरुन पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला़
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नगर शहरातील दिल्लीगेट येथे महात्मा फुले यांना अभिवादन करुन कॉ़ बाबा आरगडे, दूध उत्पादक संघर्ष समितीचे नेते गुलाबराव डेरे यांच्या हस्ते सरकारविरोधी गुढी उभारण्यात आली़
दूध धंद्याला नवसंजीवनी प्राप्त होण्यासाठी दुधाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळण्यासाठी कडक कायदा करावा, अशी मागणी करीत आंदोलकांनी नागरिकांना मोफत दुधाचे वाटप केले.
प्रत्यक्षात मिळतो १७ रुपये दर
दूध उत्पादक शेतकºयांना राज्य सरकारने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलीटरचा दर मिळत नसून, त्यांना प्रत्यक्षात १७ रुपये दर मिळतो. राज्यात दूध भेसळ वाढली आहे़ सरकारच्या मेहेरबानीने शेतकºयांच्या जीवावर डेअरीमालक कोट्यधीश झाले. मात्र दूध उत्पादक शेतकºयाला त्याच्या श्रमाचा मोबदला दिला जात नाही, अशी टीका अॅड़ कारभारी गवळी यांनी केली.