गोळीबार प्रकरणातील आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा: बाळासाहेब थोरात
By अरुण वाघमोडे | Published: February 9, 2024 04:46 PM2024-02-09T16:46:13+5:302024-02-09T16:46:32+5:30
थोरात यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले.
अहमदनगर: नगर जिल्ह्यात वकिल दाम्पत्याची निर्घूण हत्या झाली, मुंबईत माजी नगरसेवकाला गोळ्या घातल्यात तर उल्हासनगरमध्ये भाजपाच्या आमदारानेच पोलीस ठाण्यातच गोळीबार केला आहे. अशी राज्यातील स्थिती असून सत्ताधाऱ्यांचे सहकारीच गुन्हेगार झाल्याने जनता दहशतीखाली आहे. सत्तेच्या स्पर्धेत महत्त्वकांक्षेपोटी एकत्र आलेले मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न साडेवण्यासाठी वेळे नाही. असे सांगत गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाने केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले राज्य सरकारचा गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही. म्हणून अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होत नाही, कापूस, स्वयाबिनला भाव नाही. स्वायत्त संस्था राज्यकर्त्यांच्या गुलाम झाल्या आहेत. यातूनच शिवसेना-राष्ट्रवादीबाबत झालेले निर्णय हे पूर्णत: राजकीय आहेत.
सध्या आरक्षणाच्या मागणीवरूनही सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहेत. यातही राज्य सरकार राजकारण करत आहे. भाजपाची कार्यपद्धती पूर्णत: जनतेच्या विरोधातील आहेत. भाजपातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी मात्र, वस्तुस्थिती मांडत असताना त्यांना राजधर्म कळतो. असे थोरात म्हणाले. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहराध्यक्ष किरण काळे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थित होते.