मुख्यमंत्र्यांकडून 'इंदुरीकरांचे' स्वागत, महाराजांकडून भाजपाला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 05:57 PM2019-09-13T17:57:47+5:302019-09-13T18:03:00+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचली.
मुंबई - सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे.
भाजपात सध्या मेगा भरती सुरू असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसेल यांनीही भाजपा प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यातच, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचली. संगमनेरमधील या व्यासपीठावर चक्क निवृत्ती महाराज इंदूरीकर पाहायला मिळाले. आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजांचे स्वागत केले. तसेच, महाराजांसोबत चर्चाही केली आहे. विशेष म्हणजे या महाजनादेश यात्रेला महाराज उपस्थित राहिले, पण भाजपा प्रवेश केल्याची किंवा आपली कुठलिही राजकीय भूमिका इंदुरीकर यांनी जाहीर केली नाही. त्यामुळेच, भाजपाच्या झेंड्याशिवायच इंदुरीकर महाराज व्यासपीठावर दिसत आहेत.
डोक्यावर टोपी, कपाळी गंद आणि पांढरा नेहरू कुर्ता परिधान केलेल्या महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, भाजप समर्थकांकडूनही हे फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत असून इंदुरीकर महाराजांनी भाजपाला शुभेच्छा दिल्याचे मेसेजही या फोटोसोबत लिहिले जात आहेत.