एकीतून चिखलठाणची जलक्रांती; तयार झाली बंधा-यांची साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:04 PM2020-06-28T16:04:31+5:302020-06-28T16:05:24+5:30
लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली.
सुभाष आंग्रे ।
म्हैसगाव : लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ढगफुटीमुळे बंधारे फुटून शेतीचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बंधारे फुटल्याने अडणारे पाणी वाहून गेले. बंधा-यांची पाहणी प्रशासकीय अधिका-यांनी केली. बंधारे दुरुस्त करण्याची ग्वाही दिली. यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव दाखल करण्यात आला. पावसाळा जवळ येऊनही बंधा-यांची दुरुस्ती होत नव्हती. सरकारी अनास्थेमुळे सरपंच डॉ. सुभाष काकडे यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून बंधारे बांधण्याची कल्पना पुढे आली. यासाठी संजय काकडे, गंगाधर काकडे, सुभाष काकडे, शांताराम काकडे, अनिल काकडे, बाळासाहेब काकडे, राजेंद्र काकडे, आबासाहेब काकडे, नंदू काकडे, भिमराज काकडे, हेमंत गायकवाड यांनी सहकार्य केले.
गावातील प्रत्येक कुटुंबाकडून आर्थिक मदत गोळा करण्यात आली. यासाठी ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर दिले. प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर जेसीबी ट्रॅक्टर या यंत्राच्या साहय्याने पहिला बंधारा दहा ते बारा दिवसात बांधून तयार झाला. गावातील युवकांनी या लोक सहभागाच्या कामाला चिखलठाणची जलक्रांती हे नाव दिले. देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तळयाच्या कामासाठी मोफत पॉकलॅण्ड दिले. दुसºया बंधाºयाचे कामही दहा बारा दिवसात पूर्ण झाले. लोकसहभागातून दोन मोठ्या बंधाºयाचे काम हे दहा ते अकरा लाखांत पूर्ण झाले.
गावातील अनुभवी नागरिकांनी अभियंत्याची भूमिका पार पाडली. तिस-या बंधा-याच्या जागा निश्चित करून त्याचाही शुभारंभ करण्यात आला आहे.
मागील वर्षी ढगफुटी होऊन अचानक जास्त पाणी आल्याने बंधारा फुटून पाणी वाहून वाया गेले होते. बंधा-यांच्या नादुरुस्तीमुळे याही वर्षी पावसाचे पाणी वाया जाणार होते. यासाठी लोकसहभागातून बंधा-यांची दुरुस्ती व नवीन बंधारे बांधले आहेत.
- डॉ.सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण.