आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा शाळेतच २४ जून पासून प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:58 AM2020-06-20T11:58:34+5:302020-06-20T11:59:18+5:30
अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यात राज्यात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.
त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना संदेश पाठवण्यात आले आहेत. दरम्यान आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस शासनाने परवानगी दिली आहे. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून होत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ही प्रक्रिया यंदापुरती शाळास्तरावर होणार आहे. म्हणजे कागदपत्रांची सर्व पडताळणी शाळास्तरावरच होईल व अंतिम मान्यता तालुका पडताळणी समिती देईल.
शाळांनी प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावून निवड झालेल्या मुलांच्या पालकांना संदेश पाठवून प्रवेशासाठी बोलवायचे आहे. गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे आॅनलाईन नोंद करावी, तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, अशी नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे शिक्षण विभागाच्या सूचनांत म्हटले आहे.
---
जिल्ह्यात ७९६५ अर्ज
आरटीईनुसार जिल्ह्यातील ३९६ शाळांत ३५४१ जागा भरायच्या आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून ७ हजार ६५ अर्ज दाखल झाले होते.पैकी ३३८२ विद्यार्थ्यांची निवड लॉटरीतून झालेली आहे. इतर जण प्रतीक्षा यादीत आहेत.