साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:01 PM2019-06-01T19:01:50+5:302019-06-01T19:09:42+5:30
एक वर्षाच्या आतील वयाच्या मुलाला साई मंदिरात दर्शनाला नेण्यापूर्वी आता प्रवेश द्वारावर त्याची नोंद करावी लागणार आहे.
शिर्डी : एक वर्षाच्या आतील वयाच्या मुलाला साई मंदिरात दर्शनाला नेण्यापूर्वी आता प्रवेश द्वारावर त्याची नोंद करावी लागणार आहे. शिर्डी साईमंदिराजवळील गुरूस्थान येथील दानपेटीजवळ एका महिलेने सहा महिन्यांच्या मुलीस बेवारस सोडून गेल्याचे साई संस्थानच्या सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. ही घटना काल घडली. साईबाबा संस्थानने या घटनेचा बोध घेत आता एक वर्षाच्या आतील मुला-मुलींना मंदिरात प्रवेश करतेवेळी पालकांची ओळख गेटवरील रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
साई मंदिर परिसरात येण्या जाण्यासाठी एकुण 5 गेट आहेत. संस्थानच्या दर्शनबारी व्यतिरीक्त अनेकदा 3 नंबर आणि 4 नंबर गेटने स्थानिक भाविक आणि इतर भाविक मंदिर परिसरात प्रवेश करतात. याठिकाणी सीसीटीव्ही असले तरी त्यांची ओळख पटवणे अवघड जाते. यावर उपाय म्हणुन आता एक वर्षाच्या आतील अपत्यास साई मंदिरात नेताना पालकांना त्यांच्या ओळखीकरिता गेटवरील रजिस्टरमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहेत.