जादुई दुनियेत रमली बाल विकास मंचची मुले
By Admin | Published: August 9, 2016 11:52 PM2016-08-09T23:52:03+5:302016-08-10T00:23:04+5:30
अहमदनगर : जादूच्या दुनियेत रमण्यासाठी आतूर झालेली मुले... स्टेजचा पडदा उघडला अन् सर्वांची डायरेक्ट एन्ट्री झाली ती देशातील सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दुनियेत
अहमदनगर : जादूच्या दुनियेत रमण्यासाठी आतूर झालेली मुले... स्टेजचा पडदा उघडला अन् सर्वांची डायरेक्ट एन्ट्री झाली ती देशातील सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दुनियेत. लोकमत बाल विकास मंचच्या वतीने सदस्यांसाठी नंदनवन लॉन येथे जादूच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाल विकास मंच सभासद नोंदणी (२०१६-१७) चे मुख्य प्रायोजक साई सूर्य नेत्र सेवाचे डॉ.प्रकाश कांकरिया, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे कर्नल डी.ए. पाटील, कै.वि.ल. कुलकर्णी शाळेच्या सुनंदा धिमते, समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे डी.एम. कासार, बाणेश्वर विद्यालयाचे भाऊसाहेब वाकचौरे, मार्कंडेय विद्यालयाचे क्षेत्रे, महाराष्ट्र बालक मंदिरचे सुरेश शेवाळे, सुनील कोतकर आदी मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.
या कार्यक्रमात जादूगार जितेंद्र यांनी प्रेक्षकांसमोर पत्त्यांचे खेळ, मिस्ट्रीयस सिलींडर फ्रॉम सिंगापूर, झिकझ्याक बॉय, डबल एक्स्चेंज मिस्ट्री, द फ्लार्इंग बॉक्स असे एक ना अनेक जादूचे प्रयोग सादर केले. गिलोटीन हा जिवंत माणसाची मान कापणारा खेळ पाहून लहानांसोबत मोठेही अवाक् झाले. तसेच द आर्म, इल्युजन, इंडियन रोप ट्रीक हुड विथ हॅकर चीज, द ग्लास अॅण्ड बॉटल, ट्यूब आॅफ इल्युजन अशा असंख्य जादुई प्रयोगांनी बच्चे कंपनींची मने जिंकली.
सम थिंग फॉर्म नथींग तसेच एका रूमालाचे दोन रूमाल करणे असे जादूचे प्रयोग यावेळी रंगले. कार्यक्रमाला अत्युच्च उंचीवर घेऊन जाणारा प्रयोग म्हणजे टेबलावर माणसाचे दोन तुकडे करणे. या कार्यक्रमास बच्चे कंपनींनी भरभरून प्रतिसाद दिला.
जाड पत्र्यातून माणूस आरपार, माणूस नाहीसा करणे, खाल्लेला चेंडू कानातून बाहेर काढणे या सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय जादूंनी प्रेक्षकांचे मन खिळवून ठेवून जितेंद्र रघुवीर यांनी धम्माल उडवून दिली. लहान मुलांची गर्दी, टाळ्यांचा कडकडाट, वन्स मोअरची दाद, हसण्याचा आवाज, चिमुकल्यांची उत्सुकता, चेहऱ्यावरचे आश्चर्याचे हावभाव हे कसे घडले, या विचारात रंगलेल्या जादूच्या प्रयोगांनी बाल चमूंनी मनसोक्त आनंद लुटला. (प्रतिनिधी)