साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानजोगी कुटुंबासोबत केली दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 02:19 PM2019-11-01T14:19:15+5:302019-11-01T14:20:02+5:30
शिर्डी येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़.
शिर्डी : येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़.
१७ मे २०१३ रोजी स्मशानभूमीतच दोन ते सहा वयोगटातील तीन मुले-मुली बेवारस मिळाली़. त्यांना घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी यांनी अनाथाश्रमाची स्थापना केली़. सात वर्षानंतर आज या माध्यमातून १ ते १९ वयोगटातील १०४ अनाथ मुले-मुली एका कुटुंबाप्रमाणे एका छताखाली आनंदाने राहत आहेत़. जेथून आपल्या कामाचा श्रीगणेशा झाला. ती स्मशानभूमी येथील अनाथांसाठी एखाद्या मंदिराप्रमाणे आहे़. या स्मशानभूमीत गंगाराम गायकवाड व त्यांचे कुटुंब राहते़. प्रत्येक अंत्यविधीच्या वेळी रात्रीबेरात्री हे स्मशानजोगी कुटुंब नि:स्वार्थपणे मदत करत असते़. स्मशानभूमीत गेलेल्या प्रत्येकाच्या दु:खात सहभागी होणा-या या कुटुंबाचा मात्र दिवाळीसारख्या आनंदाच्या क्षणी मात्र समाजाला विसर पडतो़. त्यामुळे साईआश्रयाचे संस्थापक गणेश दळवी यांनी यंदाची दिवाळी अनाथांसह स्मशानभूमीत साजरा करण्याचा निर्णय घेतला़.
दळवी यांनी अनाथालयातील मुलांसह स्मशानभूमीत जाऊन दिवे लावले. गायकवाड
कुटुंबाला नवीन कपडे, मिठाई व फटाके भेट दिले़. अनाथांच्या या अनपेक्षित भेटीने गायकवाड कुटुंब भावुक झाले़. ज्यांचा कुणी स्वीकार करायला तयार नाही अशा मुला-मुलींना आम्ही आमच्या अनाथालयाच्या कुटुंबात सहभागी करून घेतो़ दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे पालनपोषण तसेच शिक्षण करतो़. या आश्रमातील तीन मुलींचे विवाह झाले असून त्या आनंदाने सासरी नांदत आहेत़. जवळपास दहा ते अकरा प्रकारचे व्यंग घेऊन जन्माला आलेल्या एका सात दिवसांच्या मुलीला रूग्णालयात सोडून देण्यात आले होते़. चार वर्षापूर्वी तिला आश्रमात आणून तिच्यावर प्लास्टिक सर्जरीच्या सात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे, असे साईआश्रमाचे गणेश दळवी यांनी सांगितले.