पालावरच ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:04 PM2019-11-15T14:04:06+5:302019-11-15T14:04:40+5:30
एकीकडे विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात बाल दिन साजरा झाला, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडात दाखल झालेल्या तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन पालावर व उसाच्या फडातच साजरा झाला.
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : एकीकडे विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात बाल दिन साजरा झाला, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडात दाखल झालेल्या तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन पालावर व उसाच्या फडातच साजरा झाला. त्यातील अनेक जण शिक्षणापासूनही वंचित आहेत. तर काहीजण शाळेत जाणारीही होती.
गेल्या वर्षी पाऊस कमी पडला परिणामी उसाच्या फडांचा कोळसा झाला. त्यामुळे ५० टक्के साखर कारखाने बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत श्रीगोंद्यातील साईकृपा (ढवळगाव) व पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यंदा पाऊस बरा होता. पण परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला सोन्यासारखा घास हिरावून नेला. ते दु:ख, वेदना घेऊन मराठवाडा, खानदेशमधील हजारो ऊस तोडणी मजूर फडात दाखल झाले आहेत. मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे काही कुटुंब ऊस तोडणीसाठी आली आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची लहानमोठी मुलेही आहेत.
५ ते १५ वयोगटातील शाळकरी मुले आणि छोटी-छोटी बालकेही आहेत. गुरुवारी सर्वत्र बाल दिन उत्साहात साजरा होत असताना ऊस तोडणी मजुरांची मुले त्यांच्या छोट्या पालाभोवतीच खेळातांना दिसत होते.
यंदा गावाकडे सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरीची पिके जोमात होती. पण, परतीच्या पावसाने सर्व वाहून नेले आणि मोकळ्या हाताने उसाच्या फडात आलो, असे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगार वामन जगताप यांनी सांगितले.
मी आमच्या गावातील शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी आले. घरी कोणीच नसल्याने मलाही शाळा सोडून त्यांच्याबरोबर यावे लागले. मला शाळा शिकण्याची इच्छा आहे, ऊसतोड मजुराची मुलगी पूजा वाघ यांनी सांगितले.