चिमुकल्यांना ही कोरोना मुक्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:57+5:302021-05-12T04:20:57+5:30
सुपा : कोरोनाच्या आपत्तीचा फटका चिमुकल्यांना ही बसला असून एरव्ही घराजवळच्या मोकळ्या पटांगणात, रस्त्यावर, मैदानावर दिवसभर धुडगूस घालणारे ...
सुपा : कोरोनाच्या आपत्तीचा फटका चिमुकल्यांना ही बसला असून एरव्ही घराजवळच्या मोकळ्या पटांगणात, रस्त्यावर, मैदानावर दिवसभर धुडगूस घालणारे शाळकरी व चिमुकल्या मुलांना ही कोरोना मुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.
पालकांनी, आईवडिलांनी मुलांना घराबाहेर पडण्यास बंदी घातल्याने दिवसेंदिवस घरातच थांबावे लागल्याने या चिमुकल्यांच्या जीवाचा कोंडमारा होत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा सारख्या दाट लोकवस्तीच्या गावात एरव्ही घराजवळच्या रोडवर, परिसरात, मोकळ्या जागेवर, मैदानावर दिवसभर धुडगूस घालणारे शाळकरी मुले व लहान लहान मुले त्यांचा आवाज, गडबड गोंधळ, चिवचिवाट ऐकू येईनासा झाला आहे. ही चिमुकली मंडळी त्यांच्या इच्छेविरुद्ध घरातच थांबतात, त्यामुळे खेळण्याच्या सर्व जागा ओस पडल्याचे दिसतात. त्यामुळे ही मुले आता कोरोना केव्हा संपेल ? अशी विचारणा आपल्या आईवडिलांकडे करताना दिसतात.
लॉकडाऊनमुळे घालण्यात आलेले निर्बंध, त्याचे पालन करण्याची वेळ मुलांवर ही आल्याने दरवर्षी सुटीला आजी-आजोबा, मामा-मामी, काका- काकीकडे खेडेगावात जाणाऱ्या मुलांनाही आता त्यांच्याकडे जाणे शक्य नसल्याने आता ही बालके कंटाळले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका मोठा असल्याने व कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी दिलेले नियम तर पाळले पाहिजेत तरच या महामारीतून सुटका होईल, अशी समजूत आईवडिलांकडून काढली जातेय. आता आलेली वेळ, काळ वाईट असला तरी तो लवकरच संपेल व आपल्याला मुक्तपणे आपल्या सवंगड्यांसोबत खेळता बागडता येईल तोपर्यंत राहू या घरात अशी मानसिकता त्यांच्यात तयार होत असल्याचे दिसतेय.
फोटो - सुपा
पारनेर तालुक्यातील सुपा येथील नवीन वसाहतीत तयार झालेल्या या रोडवर सायकल खेळणारे, क्रिकेट, लपाछपी असे खेळ दिवसभर खेळत गोंगाट करणारी बालके घरातच थांबत असल्याने असा शुकशुकाट व भयानक शांतता दिसत आहे.