आजारातून बरी होत चिमुरडी परतली घरी; डॉक्टर,नर्सेसही गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:24 PM2020-05-31T17:24:35+5:302020-05-31T17:24:42+5:30
अहमदनगर : आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी ती सुखरुप आपल्या घरी परतली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफही गहिवरला.
अहमदनगर : आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी ती सुखरुप आपल्या घरी परतली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफही गहिवरला.
कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले. पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत तिला निरोप दिला. ‘कोरोना’ला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेशही यातून पोहोचला.
काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, यातच आजीचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तीचे वडीलही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला. डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि रविवारी ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली.
---
अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे. त्यासाठी आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची गरज आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे.
-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक