पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे गावी चिंकारा हरणाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 10:02 AM2020-08-03T10:02:44+5:302020-08-03T10:05:24+5:30
पाथर्डी : तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.
हरिहर गर्जे
पाथर्डी : तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.
रविवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास मोहोज देवढे येथील राखीव वन क्षेत्रा मध्ये हरणाची शिकार करण्यासाठी काही शिकारी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मोहोज देवढे येथील वनक्षेत्रा कडे धाव घेतली. वनपाल बबन मंचरे,वनरक्षक वर्षा गीते, वनकर्मचारी लक्ष्मण ढोले,बाबू मरकड,इंद्रभान चितळे,श्रीधर काकडे यांनी शिकाऱ्यांचा शोध घेतला असता वन विभागाच्या राखीव जंगलात एका ठिकाणी जाळी लावून अज्ञात चार ते पाच शिकारी हरणाची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या कर्मचार्यांना पाहून शिकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले परंतु घटना ठिकाणी शिकारीसाठी लावलेली जाळी व त्यामध्ये हे अडकलेले मृत हरण असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेली जाळी नष्ट करण्यात आली संबंधित अज्ञात शिकाऱ्यांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. हरणाची हत्या करणाऱ्या शिकाऱ्या बाबत वनविभागास महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून लवकरच शिकाऱ्यांना पकडण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले.
----
पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही वर्षापासून चोरून स्थानिक शिकारी हरीण व मोरांची शिकार करत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. याबाबत वनविभागाने संबंधित शिकाऱ्यांचा शोध घेवून कठोर कारवाई करावी व वनसंपदा वाचवावी, अशी मागणी वन्यप्रेमी नागरीकामधून होत आहे.
फोटो – मोहज देवढे येथे शिकाऱ्यांनी हत्या केलेले चिंकारा जातीचे मृत हरीण.
Attachments area