जमावाकडून चोरट्यांना चोप
By Admin | Published: September 13, 2014 10:37 PM2014-09-13T22:37:38+5:302024-03-20T11:04:35+5:30
अहमदनगर : बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात इसमांना जमावाने चांगलाच चोप देवून पोलिसांच्या हवाली केले.
अहमदनगर : एका कामगार ठेकेदाराने कामगारांच्या पगारासाठी बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात इसमांना जमावाने चांगलाच चोप देवून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शनिवारी मार्केटयार्ड परिसरात घडली.
एम.आय.डी.सी.तील कामगार ठेकेदार बाबुराव भानुदास बडे यांनी मार्केटयार्ड भागातील मर्चंटस् बँकेतून अडीच लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीकडे दिली. ते दुचाकीवरून पैसे घेऊन जात असताना दोन अज्ञात युवकांनी बडे यांचा पाठलाग केला. बंगाल चौकी, ख्रिस्तगल्लीमार्गे ते कापडबाजारातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेकडे येत असताना दोन अज्ञात युवकांनी बडे यांच्या पत्नीच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हातात बॅग पक्की धरल्याने ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. चोरट्यांच्या धसक्याने त्या खाली पडल्या त्या वेळीही चोरट्यांनी बँग पळविण्याचा प्रयत्न केला. कापड बाजारातील या थराराने अनेक जणांना घाम फुटला. यावेळी अडथळे पार करीत बडे आणि चोरटे दुचाकीवरून धावत असताना जमावाने चोरट्यांना पकडून चांगलाच चोप दिला. चोरीची विनाक्रमांकाची मोटारसायकल वापरून त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बडे यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी.एस. जाधव तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)