हातगाव परिसरात चोरट्यांच्या मारहाणीत चौघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:50 PM2018-02-10T14:50:44+5:302018-02-10T14:51:04+5:30
शेवगाव तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
शेवगाव : तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटे साधारण दोनच्या सुमारास ही घटना घडली.
जखमींमध्ये देविदास साहेबराव गादे (वय ४९), सिंधूबाई कुंडलिक शेंडे (वय ५५), दत्तात्रय बापूसाहेब बर्गे (वय ५०), मंदाबाई दत्तात्रय बर्गे (वय ४५) यांचा समावेश आहे. हातगाव शिवारातील मुंगी कॅनॉल जवळील ९ नंबर चारी परिसरात गादे व बर्गे वस्ती आहे. चोरट्यांनी घराबाहेर झोपलेल्या या चौघांना लाकडी दांडके व गजाने मारहाण करून जखमी केले. यावेळी चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल संच व रोख रक्कम असा जवळपास ८२ हजार किंमतीचा ऐवज लांबविला. तसेच देविदास गादे यांच्या मुलाला कोंडून जखमी केले.
शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पोलिसांना तपासाच्यादृष्टीने सूचना दिल्या. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख घनश्याम पाटील, पोलीस उपधीक्षक गृह जगताप यांनीही घटनास्थळास भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्याने पिंगेवाडी पुलापर्यंत माग दाखविला. याबाबत देविदास गादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमासे करीत आहेत.