सुपा ग्रामपंचायतीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:07+5:302021-01-13T04:53:07+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या सुपा ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. १५ जागांसाठी सरळ लढत होत ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या सुपा ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. १५ जागांसाठी सरळ लढत होत असून ४ अपक्ष निवडणूक रिंगणात असून नशीब आजमावत आहेत.
५ प्रभागांत प्रत्येकी ३ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ५ हा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. यात जवळपास १३०० च्यावर मतदान आहे. तीन जागेकरिता सरळ लढतीकरिता ४ अपक्ष उमेदवार मिळून १० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जनसेवा मंडळ व एकता विकास मंडळ अशा दोन मंडळांतील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही मंडळांचे प्रचारकार्य जोरात असून अपक्ष उमेदवारही यात मागे नाहीत. थेट मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला जातोय. जनसेवा मंडळाचे नेतृत्व दीपक आबा पवार, बाळासाहेब पवार, दिलीप पवार, दत्ता नाना पवार, विजय पवार करीत आहेत. एकता विकास मंडळाच्या नेतृत्वाची धुरा राजूशेठ शेख, अंकुश वाढवणे, सचिन काळे, योगेश रोकडे, किरण पवार, सचिन पवार सांभाळत आहेत. निवडणुकीत तरुण सक्रिय झाल्याने व जेष्ठांचे मार्गदर्शन, गाठीभेटी, चर्चा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बिनविरोध निवडणूक विचारापासून दुरावलेले कार्यकर्ते आता मात्र झपाटून प्रचारकार्यात उतरले आहेत. असे असले तरी सरपंचपदाचे आरक्षण निघालेले नसल्याने सगळेच गावकारभारी सत्ता संपादन करण्याच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरले आहेत.