गव्हाला गेरवा रोगाचा घेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:58+5:302020-12-14T04:33:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : यंदा पाऊस भरपूर पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. मात्र, थंडी गायब ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : यंदा पाऊस भरपूर पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. मात्र, थंडी गायब झाल्याने गव्हावर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. ऊसतोडणी सुरू झाली. अतिपावसामुळे कपाशी पीक वाया गेले. त्यामुळे कपाशी व तूर काढून गव्हाची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी यावर्षी थंडी नाही. गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे गहू व जिरायती भागात ज्वारीचे पीक जोमात येते. पुरेसे पाणी असल्याने यंदा गव्हाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली. मशागत, बियाणासाठी मोठा खर्च झाला; परंतु गव्हाच्या पिकाची वाढ खुंटली आहे. त्यात गेल्या आठ दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या पिकावर होत असून, गेरवा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. थंडीचे कमी दिवस शिल्लक राहिल्याने थंडीअभावी गव्हाचे पीक येईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
रबीवर शेतकऱ्यांची भिस्त आहे; पण, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, केलेला खर्च वसूल होतो की नाही, अशी परिस्थिती आहे.
...
गेरवा, मावा, तांबेराची भीती गडद
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गव्हावर गेरवा, मावा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हा रोग येऊ नये यासाठी रोग, निंबोळी पेंड आणि एम-४५ ची फवारणी करावी. ही फवारणी केल्यावर गव्हावरील रोग येणार नाही, अशी माहिती दहीगाव येथील नारायण निंबे यांनी दिली.