‘एमआयडीसी’च्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:21+5:302021-04-12T04:18:21+5:30
नागापूर मनपाच्या हद्दीमधून एमआयआरसीच्या पिण्याच्या पाईप लाईनचे काम चालू आहे. ठेकेदार सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उखडीत ...
नागापूर मनपाच्या हद्दीमधून एमआयआरसीच्या पिण्याच्या पाईप लाईनचे काम चालू आहे. ठेकेदार सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उखडीत असून मनपाच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेजची लाईन तुटल्या आहेत. नगर -मनमाड रोडवरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक तक्रार करूनही याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेत नाहीत. पावसाळ्यापूर्वी एमआयडीसी परिसरातील एल व एम ब्लॉक मधील पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावावी. हे पाणी थेट सिना नदीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करावी. बोल्हेगांव फाटा, गणेश चौक, काकासाहेब म्हस्के परिसरामध्ये नागरिकांची मोठी लोकवस्ती आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले जाते. मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी एमआयडीसी कार्यालयाने उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागापूर, बोल्हेगांव परिसरातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. एल ब्लॉकमधील कारखानदारांनी केमिकल, प्लास्टिक, दूषित रासायनिक पदार्थ, खराब कागद हे पावसाळी पाण्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडले आहे. त्यामुळे केमिकलमुळे शेतातील पिके नष्ट होतात. जमिनीचा कसही निकृष्ट होतो. त्यामुळे शेतीच्या उत्पादनाची क्षमता कमी झाली आहे. एमआयडीसी कार्यालयाने चुकीचे ओढे नाले दर्शवून शेतकऱ्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे केमिकलयुक्त पाणी सोडले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या भागातील शेतकरी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करतील. असा इशारा नगरसेविका कमल सप्रे, अशोक बडे, मदन आढाव, रिता भाकरे यांनी दिला. यावेळी भालचंद्र भाकरे, सतीश नेहुल आदी उपस्थित होते.