आरोग्यसेविकांच्या अंगावर धावून आले नागरिक; मुकुुंदनगर येथील प्रकार, दोन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:02 PM2020-03-30T17:02:00+5:302020-03-30T17:03:03+5:30
कोरोना साथीच्या संदर्भात शहरातील मुकुंदनगर परिसरात माहिती संकलित करीत असलेल्या आरोग्यसेविकांना सोमवारी (दि.३० मार्च) सकाळी काही नागरिकांनी दमदाटी त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर : कोरोना साथीच्या संदर्भात शहरातील मुकुंदनगर परिसरात माहिती संकलित करीत असलेल्या आरोग्यसेविकांना सोमवारी (दि.३० मार्च) सकाळी काही नागरिकांनी दमदाटी त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
नगरमध्ये रविवारी आणखी दोन करोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. हे रुग्ण नगरमध्ये असताना मुकुंदनगर भागात राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा परिसर प्रशासनाने तातडीने सील केला केला आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून आरोग्यसेविकांच्या मार्फत मुकुंदनगर परिसरात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात कुटुंबात कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का? तसेच परदेशातून तुमच्या घरी कुणी आले आहे ? या संदर्भात माहिती घेत आहेत. मुकुंदनगरमधील नागरिक मात्र आरोग्यसेविकांना माहिती देत नसून त्यानाच दमदाटी करीत आहेत. काही ठिकाणी माहिती विचारण्यास गेल्यानंतर या आरोग्यसेविकांना दमदाटी करत त्यांच्याकडील रजिस्टर फाडून टाकले. काहींनी दरवाजे लावून घेतले तर काही थेट अंगावर धावून आले. अशा तक्रारी आरोग्यसेविकांनी केल्या आहेत. या घटनांनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले असून तिसरा गुन्हा दाखल होण्याची प्र्रकिया सुरू आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिली भेट
मुकुंदनगर परिसरात आरोग्यसेविकांना दमदाटीचे प्रकार घडल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या परिसरात भेट देऊन माहिती घेतली. सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्यसेविकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.