मुंबईहून आलेल्या नागरिकांकडून कुरणच्या ग्रामसेवकाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 06:47 PM2020-07-04T18:47:24+5:302020-07-04T18:47:48+5:30
मुंबईतील घाटकोपरहून कुरण (ता़ संगमनेर) येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला पुन्हा दुसऱ्यांदा शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली.
संगमनेर : मुंबईतील घाटकोपरहून कुरण (ता़ संगमनेर) येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला पुन्हा दुसऱ्यांदा शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले तर दोन महिलांचाही समावेश आहे.
जाकीर समशेर शेख, जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शाहीन जाकीर शेख, यास्मीन समशेर शेख, वसीम समशेर शेख, कय्युम महम्मद हुसेन शेख ( सर्व रा. घाटकोपर, मुंबई, हल्ली रा.कुरण, ता.संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गंगाधर चंद्रभान राऊत असे कुरण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे नाव असून त्यांना दुसऱ्यांदा शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली.
११ जूनला जाकीर समशेर शेख व त्याच्या कुटुंबातील लोक मुंबईतील घाटकोपरहून कुरण गावात आल्याची माहिती ग्रामसेवक राऊत यांना मिळाली होती. ग्रामसेवक राऊत यांनी जाकीर शेख याच्या घरी जात त्याला व त्याच्या कुटुंबातील २२ लोकांना गावातील जिल्हा परिषद शाळेतील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दहा दिवस व त्यानंतर पुढील सात दिवस घरी राहण्याची समज दिली होती. याचा जाकीर शेख याला राग आल्याने त्याने राऊत यांच्या मोबाईलवर फोन करीत त्यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. ग्रामपंचायतीसमोरही त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी राऊत यांनी २६ जूनला त्याचेविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला़ पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी तपास करीत आहेत.