वाळूंज बाह्यवळण रस्त्यासाठी नागरिकांचा रास्तारोको; १५ दिवसात काम सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:19 PM2020-02-28T14:19:59+5:302020-02-28T14:20:35+5:30
वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
निंबळक : वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होईल. त्यावर दररोज पाणी मारले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
नगर-सोलापूर महामार्गावरील वांळुज (ता.नगर) ते नगर-मनमाड बाह्यवळण रस्ता आहे. विळदपासून वांळुजच्या शिवारापर्यत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र वांळुज येथील बाह्यवळण रस्त्यालगत असणा-या वस्तीजवळ हे काम येऊन थांबले. ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे हा रस्ता रखडला आहे. दीड किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्यालगत नागरिकांची घरे, शेती आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे आजाराचे प्रमाण वाढलेले. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करावा, याबाबतचे निवेदन महादेव शेळमकर व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे वांळुज येथील ग्रामस्थांनी सोलापूर महामार्गावरशुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता आंदोलन केले. यावेळी महिलांनी मालवाहतूक गाडया अडवल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना घेराव घालून हा रस्ता तातडीने मार्गा लावण्यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी सरपंच लताबाई महादेव शेळमकर, संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर, राजेंद्र कडिले, सुखदेव दरेकर, संदीप मोरे, कुंदन शिंदे, अनिल मोरे, बाजीराव दरेकर, विजय शेळमकर, रावसाहेब शिंदे, सोमनाथ जाधव, नवनाथ हिंगे ,भरत दरेकर, वैभव सपाटे, लंकाबाई दरेकर, शोभा दरेकर, शंकुतला हिंगे ,सरस्वती दरेकर, अलका शिंदे, चंदाबाई जाधव, महंमद पठाण, बाळासाहेब कोल्हे, मोहन दरेकर, आकाश जाधव, संतोष गायकवाड, विजय हिंगे, कुंडलिक दरेकर उपास्थित होते.