अत्यावश्यक कामांसाठीच नागरिक करताहेत बसमधून प्रवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:30+5:302021-04-29T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्यातील लॉकडाऊन काळात एस. टी. महामंडळाने अत्यावश्यक कारणांसाठी काही प्रमाणात बसेस सुरू ठेवल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : राज्यातील लॉकडाऊन काळात एस. टी. महामंडळाने अत्यावश्यक कारणांसाठी काही प्रमाणात बसेस सुरू ठेवल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक अत्यावश्यक कामासाठीच बसमधून प्रवास करीत आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सुविधा वगळता महिनाच्या सुरुवातीपासूनच कडक लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र, एवढे करूनही दररोज प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जाणारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी एस. टी. महामंडळाने बसेस सुरू ठेवल्या आहेत.
नगर जिल्ह्यात नगरसह एकूण १४ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यातून नगर येथे व नगरहून प्रत्येक तालुक्यात दररोज एस. टी. बसच्या फेऱ्या सुरू आहेत. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह ज्याच्यावर नगर येथे वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशा रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी रेमडिसिवरसह इतर इंजेक्शन, प्लाझ्मा बॅग व इतर औषधी, जेवणाचे डबे देण्यासाठी नातेवाईक बसने प्रवास करीत आहेत. तर दुसरीकडे अत्यंत जवळच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीस जाण्यासाठीदेखील काही नागरिक बसने प्रवास करीत आहेत.
............
माझे आई-वडील वयोवृद्ध असून, पुण्यात राहतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना तेथील जवळच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सांगितले; परंतु ते अशिक्षित असल्याने काय करावे हे त्यांना सुचत नाही. शेवटी त्यांनी रात्री मला फोन करून पुण्यास बोलविले आहे. त्यासाठी तातडीने बुधवारी सकाळी कोपरगाव येथून बसमधून पुण्यास जाण्यासाठी निघाले आहे.
- महिला, प्रवासी, कोपरगाव
..........
आम्हालादेखील कोरोनाची भीती वाटते, त्यामुळे जिवाच्या भीतीने घरातून बाहेर पडण्याची धाडस होत नाही. परंतु आयुष्यात काही प्रसंग असे येतात, त्यांसाठी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडावेच लागते. कोपरगावातील अत्यंत जवळच्या नातेवाइकाचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी आले होते. अंत्यविधी झाला आता पुन्हा बसमधून नगरला जाण्यासाठी कोपरगाव बसस्थानकावर आले आहे.
- महिला, प्रवासी, नगर
.............
माझ्या खूप जवळच्या नातेवाईकावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना उपचारासाठी रेमडिसिवर इंजेक्शनची गरज असल्याने कोपरगाव येथून ते इंजेक्शन घेऊन बसमधून नगरला देण्यासाठी जात आहे.
- पुरुष, प्रवासी, कोळपेवाडी
.........
* जिल्ह्यातील एकूण आगार - ११
* जिल्ह्यात दररोज चालणाऱ्या बसेस - ३०
* दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - १२०० पेक्षा जास्त
...........
आमच्या आगारातून दिवसभरात ये - जा करून नगर - संगमनेर ४ फेऱ्या व नगर - कोपरगाव ४ फेऱ्या अशा अत्यावश्यक बसेच्या एकूण ८ फेऱ्या होत आहेत. या फेऱ्यातून शासकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे १६० ते १८० प्रवासी प्रवास करीत आहेत.
- अभिजित आघाव, आगार प्रमुख, एस. टी. महामंडळ, तारकपूर आगार.