नागरिकांना मिळणार एका क्लीकवर सातबारा : कीआॅस्क प्रणाली होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 05:00 PM2019-06-14T17:00:11+5:302019-06-14T17:00:25+5:30

जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात.

Citizens will get one click on Saturdays: Kiosk system will be implemented | नागरिकांना मिळणार एका क्लीकवर सातबारा : कीआॅस्क प्रणाली होणार कार्यान्वित

नागरिकांना मिळणार एका क्लीकवर सातबारा : कीआॅस्क प्रणाली होणार कार्यान्वित

अहमदनगर : जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात. त्यासाठी मग अर्ज करावा लागायचा अन् काही दिवस वाट पाहावी लागायची. आता जिल्हा प्रशासनाने किआॅस्क प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्याने हे चित्र बदलणार आहे. केवळ एका क्लीकवर कोणत्याही नागरिकांना त्यांना हवी असणारी ही कागदपत्रे मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून ही सुविधा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे.

या किआॅस्क प्रणालीचा शुभारंभ शनिवार (दि.15 जून) रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
जमिनीचा सातबारा, आठ अ खाते उतारा, कडईपत्रक, जन्म मृत्यूनोंदी, इनामपत्रक आदी दस्तावेज हे शेतकरी व इतर नागरिकांसाठी महत्वाचे असतात. विविध कामकाजासाठी त्यांनी ही कागदपत्रे हवी असतात. ही महत्वाची कागदपत्रे हवी असली की, त्यांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतरही काही दिवस वाट पाहावी लागायची. त्यामुळे निकड असलेल्या नागरिकांना आता किआॅस्क प्रणालीमुळे ही कागदपत्रे तात्काळ मिळणे सुलभ होणार आहे. सन 1930 पासून ते सन 2013 पर्यंतची तब्बल पावणेदोन कोटी कागदपत्रांचे (जुने अभिलेख) स्कॅनिंग त्यासाठी करण्यात आले असून तो डाटा या प्रणालीत साठवण्यात आला आहे. यात जुने गट नंबर आणि जुने सर्वे नंबर उपलब्ध आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील श्रीगोंदा-पारनेर उपविभाग कार्यालयाच्या नजिक या किआॅस्क प्रणालीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. अगदी एटीएम मशीनप्रमाणेच याची रचना आहे. कीआॅस्क प्रणालीच्या स्क्रीनवर नागरिक त्यांना हव्या त्या माहितीवर क्लीक करुन ती कागदपत्रे मिळवू शकतील. केवळ वीस रुपयांत ही कागदपत्र त्यांना मिळू शकतील. एखाद्या नागरिकाला सातबारा हवा असेल तो स्क्रीन वर 7/12चा पर्याय क्लीक करेल. त्यानंतर तहसील, गाव, सर्वे नंबर आणि हिस्सा नंबर ही माहिती भरली की प्रिंटरवर क्लीक करुन सातबाराची डिजीटल प्रिंट त्यांना दिसेल. ही प्रणाली एटीएम मशीन सारखीच काम करते. मशीनवरील कॅश रिसीव्हर मध्ये दहा रुपयांच्या दोन किंवा वीस रुपयांची एक नोट टाकली की नागरिकांना हव्या असलेल्या दस्तावेजाची प्रत त्यांना मिळणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार (महसूल) सुधीर पाटील आणि महसूल शाखेतील अधिकारी-कर्मचा-यांनी ही किआॅस्क प्रणाली कार्यरत करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत.
ही किआॅस्क प्रणाली कोणत्याही नागरिकांना हाताळण्यासाठी अतिशय सोपी आहे. कारण, यासाठी कोणतेही स्वतंत्र असे लॉगिन करावे लागत नाही. सोप्या पद्धतीने दस्तावेज प्राप्त होतो, त्यासाठी सेवा देणा-याला अतिरिक्त शुल्क मोजावे लागत नाही. नागरिकांच्या वेळेची बचत होते. त्यांना तात्काळ हवा तो दस्तावेज मिळू शकतो. हाताळण्यास सोपी प्रक्रिया असल्याने प्रशिक्षणाची आवश्यकता भासत नाही. सातबारा, फेरफार, कडई पत्रक, जन्म मृत्यू नोंदी अशा पाच प्रकारचे दस्तावेज नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. तर नगर तालुक्यातील नागरिकांना वरील दस्तावेजासोबत इनामपत्रकही या प्रणालीद्वारे काढता येतील. ही कार्यप्रणाली अतिशय सुलभ असून एकूण किती दस्तावेज काढले गेले आणि किती रुपयांचा व्यवहार झाला, याची माहितीही तारखेनिहाय उपलब्ध होते. या प्रणालीमध्ये इतर सेवा उपलब्ध करुन द्यायच्या असल्यास तसे बदलही करता येतात, हे या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

Web Title: Citizens will get one click on Saturdays: Kiosk system will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.