नागरिकत्त्व कायदा राज्यात लागू होणार नाही-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:51 PM2020-01-11T12:51:07+5:302020-01-11T12:52:04+5:30
नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अहमदनगर : नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
थोरात म्हणाले, या कायद्यासंदर्भात रस्त्यावर व न्यायालयातही विरोध सुरु आहे. त्यामुळे हा कायदा लागू होऊ नये या मताचे आम्ही आहोत. थोरात यांच्यावर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र हे पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, मााझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तसेच विधिमंडळाचे पक्षनेतेपदही आहे. या जबाबदा-या सांभाळताना पालकमंत्रीपदाला न्याय देणे अवघड होईल. त्यामुळे पक्षातील इतर मंत्र्याला ही संधी मिळावी ही आपली प्रारंभीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे हे पद नाकारले आहे. नगरचे पालकमंत्री पद मला हवे होते म्हणून मी हा नकार दिला असे अजिबात नाही. नगरचेही पालकमंत्रीपद मला नको आहे. तसेही जिल्ह्याचे पालकत्व माझ्याकडेच असल्याने त्यासाठी खास पदाची आवश्यकता नाही.
महसूलमंत्री म्हणून काम करताना सेतूच्या कामात सुरळीतपणा कसा आणता येईल. तसेच शेतक-यांचे मोजणीचे प्रश्न कसे निकाली निघतील याबाबत आपण विशेष दक्षता घेणार आहोत. महसूलमंत्री म्हणून काम करताना यापूर्वी महसूल प्रशासन आॅनलाईन करुन आपण कामात गतिमानता आणली होती. भाजप सरकारच्या काळात त्यास खीळ बसली. आता पुन्हा एकदा महसूल विभाग गतीमान करु, असे ते म्हणाले.
फडणवीसांनी चांगला ज्योतिषी पहावा
हे सरकार अधिक काळ टिकणार नाही या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, त्यांना २२० पेक्षा जास्त जागा मिळतील. ते असेही म्हणाले होते की विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या जागा विरोधकांना मिळणार नाहीत. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली. त्यामुळे फडणविसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.