खंडणीच्या गुन्ह्यात युवा सेनेच्या शहर प्रमुखास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:34 PM2021-02-05T16:34:43+5:302021-02-05T16:35:07+5:30
कांदा व्यापाऱ्याला धमकावून २० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शिवसेनेचा युवा शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर याच्यासह तिघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अहमदनगर: कांदा व्यापाऱ्याला धमकावून २० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शिवसेनेचा युवा शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर याच्यासह तिघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
नेप्ती कांदा मार्केट येथील गाळा क्रमांक ९७ येथे गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (वय ३३ रा.वांबोरी ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डन समोर, नगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा.एकनाथनगर, केडगाव) व राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी भराडिया यांना वारंवार फोन करून तू जमिनीचा व्यवहार मोडला आहे. त्यामुळे तुला पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन २० हजार रुपयांची मागणी केली.
४ फेब्रुवारी दुपारी अक्षय कोके व त्याच्यासोबत असलेल्या एकाने भराडिय यांच्या दुकानात येऊन हर्षवर्धन कोतकर याला फोन केला. त्यानंतर कोतकर याने २० हजार रुपये देण्याचे भराडिया यांना सांगितल्यानंतर त्यांनी कोके याच्याकडे पैसे दिले. यावेळी भराडिया यांच्या दुकानात सध्या वेशात बसलेल्या पोलिसांनी कोके व त्याच्यासोबत असलेला राजेंद्र रासकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर हर्षवर्धन कोतकर यालाही अटक केली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप हे पुढील तपास करत आहेत.