नगर शहराची पाणी कपात टळली
By Admin | Published: May 2, 2016 11:13 PM2016-05-02T23:13:19+5:302016-05-02T23:29:20+5:30
अहमदनगर : मुळा धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने नगर शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत होते. फेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा सोमवारी (दि.२) पूर्ण झाला.
महापालिका : ४०० हॉर्स पॉवरचे पंप सुरू
अहमदनगर : मुळा धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने नगर शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत होते. फेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा सोमवारी (दि.२) पूर्ण झाला. पाणी उपसा करणारे चारशे हॉर्स पॉवरचे दोन पंप कार्यान्वीत झाल्याने शहराच्या पाणी कपातीचे संकट टळले आहे. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते बटन दाबून या मोटारी सुरू करण्यात आल्या.
नगर शहराला दररोज ७० दशलक्ष लीटर पाणी लागते. मुळा धरणात ५६० हॉर्स पॉवरच्या तीन तर दोनशे हॉर्स पॉवरच्या तीन अशा सहा मोटारी रात्रंदिवस सुरू आहेत. धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने पाणी उपशावर त्याचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे काही दिवसांनी शहराच्या पाणी कपातीशिवाय महापालिकेकडे दुसरा पर्यायच नव्हता. फेज टू पाणी योजनेंतर्गत दोनशे हॉर्स पॉवरच्या मोटारी काढून त्या ऐवजी चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी टाकण्यात आल्या. महावितरण कंपनीने शनिवारी त्यासाठी अतिरिक्त वीज पुरवठा केला. सोमवारी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते बटन दाबून या मोटारीचा पाणी उपसा सुरू झाला.
सभापती गणेश भोसले, सभागृह नेते कुमार वाकळे, नगरसेवक अनिल बोरुडे, आयुक्त विलास ढगे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम, ठेकेदार कंपनीचे संचालक किशोर आग्रवाल यावेळी उपस्थित होते.
उन्हाळ्यात धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने मुळा धरणातून पाणी उपसा करण्याकरीता सहा पंप रात्रंदिवस चालवावे लागत होते.
धरणातील पाणी पातळी १७५२ फुटाच्या खाली गेल्यानंतर हे पंप बंद पडायचे. आता नव्याने चारशे हॉर्स पॉवरचे पंप सुरू झाल्याने धरणातील पाणी पातळी १७५२ फुटाच्या खाली गेली तरी पाणी उपसा सुरू राहणार आहे. शिवाय ५६० हॉर्स पॉवरचे पंप बदलून त्याऐवजी सातशे हॉर्स पॉवरचे पंप टाकले जाणार आहेत. मात्र पाणी उपसा सुरू असतानाच हे काम करणे जिकरीचे असल्याने त्याला विलंब लागतो.
चारशे हॉर्स पॉवरचे पंप टाकतानाही पाणी पुरवठा विभागाला मोठे कष्ट घ्यावे लागले. पूर्वीच्या पंपातून पाणी उपसा कमी होत असल्याने पाणी कपातीचे संकट शहरावर घोंगावत होते. आता चारशे हॉर्स पॉवरचे पंप सुरू झाल्याने हे संकट टळले आहे.
(प्रतिनिधी)
पाणी पुनर्वापर प्रकल्पही कार्यान्वित
धरणातून पाणी उपसा केल्यानंतर ते विळद जल शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धीकरण करताना जवळपास पाच लाख लीटर पाणी वाया जाते. ते पाणी पुन्हा वापरात आणण्याकरीता दहा लाख रुपये खर्च करून पुनर्वापर प्रकल्प उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरणानंतर कोणतेच पाणी यापुढे वाया जाणार नाही. हा प्रकल्प पुढील आठवड्यात कार्यान्वीत केला जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
धरणात १५ जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. नव्याने चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी बसविल्या गेल्याने पाणी पातळी खाली गेली तरी पाणी उपसा सुरू राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी खालावली तरी शहराच्या पाणी उपशावर कोणताच परिणाम होणार नाही.
मुळा धरणात चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी सुरू झाल्याने विळद जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत ७० दशलक्ष लीटर पाणी धरणातील पाणी पातळी खालावली असतानाही येणार आहे. तेथून ते पाणी वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीत पोहोचले. त्यामुळे नगर शहराला उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात यामुळे होणार नाही. - संग्राम जगताप, आमदार
फेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान आहे. शहराला आता पुरेसे पाणी मिळणार आहे. दोन मोटारी बदलल्या आहेत. आणखी चार मोटारी बदलणे बाकी आहे. ते काम पूर्ण झाले की शहराला भरपूर पाणी मिळेल. धरणातील पाणी पातळी खालावली तरी शहराला आता पुरेसे पाणी मिळेल.- अभिषेक कळमकर, महापौर.