जामखेडमधील ‘त्या’ तीन व्यक्तींच्या कुटुंबातील ३२ जणांची नगरला तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:51 PM2020-04-01T17:51:22+5:302020-04-01T17:52:10+5:30
जामखेड : येथील धार्मिक स्थळावर थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. यामुळे ...
जामखेड : येथील धार्मिक स्थळावर थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. यामुळे प्रशासनाने या तीन पॉझिटिव्ह व्यक्तींच्या कुटूंबातील ३२ जणांना रात्रीच अहमदनगर येथे तपासणीसाठी तातडीने रवाना केले आहे.
जामखेड शहरात एकाच दिवशी तीन पॉझिटिव्ह निघाल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. आता घराबाहेर पडू नका एवढाच उपाय असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परदेशातील नागरिकांना तब्बल अकरा दिवस ठेवले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात अकरा दिवस थांबलेल्या परदेशी व्यक्तींपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेडमधील ३२ जणांना तपासणी करण्यासाठी नगर येथे दोन दिवसापूर्वी प्रशासनाने घेऊन गेले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी आला असता त्यातील तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या नागरिकांना आता घरातच क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. मंगळवारी जाहीर झालेले तीन पॉझिटिव्ह जामखेड शहरातील राहणारे आहेत. त्यामुळे फक्त जामखेडमधील पॉझिटिव्हची संख्या पाच झाली आहे
तीन जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तहसील, पोलीस, आरोग्य व नगरपरिषद अधिकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये तीन पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपूर्ण कुटूंबाला तपासणीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय झाला.