नगरमध्ये महापौर-उपमहापौर संघर्ष उफाळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:25 PM2017-10-13T12:25:19+5:302017-10-13T12:30:42+5:30
नगर महापालिकेचे महापौरपद शिवसेनेकडे आहे. तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. महापलिकेत सेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अहमदनगर : महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदप यांच्या पत्रावरुन आयोजित बैठक करण्यात आली होती. तरच त्याचवेळी महापौर सुरेखा कदम यांनी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची बैठक बोलावली. त्यामुळे उपमहापौर छिंदम यांची बैठक रद्द करण्याची नामुस्की प्रशासनावर ओढावली. यामुळे महापालिकेत महापौर विरुद्ध उपमहापौर असे राजकारण रंगल्याची जोरदार चर्चा आहे.
महापालिकेचे महापौरपद शिवसेनेकडे आहे़ तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे़ विधानसभेतील मित्र सेना व भाजप हे रस्त्यावर जाहीरपणे एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आता नगर महापलिकेतही सेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापौरांनी जाणीवपूर्वक उपमहापौरांच्या बैठकीत खोडा घातल्याची भावना भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून आता या मुद्यावरुन सत्ताधा-यांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. उपमहापौरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापौरांनी बैठक आयोजित केली तरी प्रशासनाने त्यांना वसुलीच्या बैठकीची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौरांमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.