नगर शहराला भयमुक्ती नाही; भैयामुक्तीची गरज : दिलीप गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:00 AM2018-12-04T11:00:00+5:302018-12-04T12:18:03+5:30
नगर शहराला कुणाचेच भय नाही. शहर ‘भैयामुक्त’ झाले की आपोआप भयमुक्त होईल. या शहराला २५-३० वर्षात गटारींशिवाय काहीच मिळाले नाही.
अहमदनगर : नगर शहराला कुणाचेच भय नाही. शहर ‘भैयामुक्त’ झाले की आपोआप भयमुक्त होईल. या शहराला २५-३० वर्षात गटारींशिवाय काहीच मिळाले नाही. शिवसेनेने या शहरात काहीही विकास कामे न करता उलट विकासात खोडा घातला, अशी टीका खासदार दिलीप गांधी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली. अनिल राठोड हेच फिक्सर असल्याचा आरोप करत ‘खासदारांनी काहीही कामे केली नाही’, असे म्हणणारे डॉ. सुजय विखे कोण? त्यांचे काय योगदान आहे? असा प्रश्न गांधी यांनी या मुलाखतीत केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत फेसबुक पेजवर गांधी यांची सोमवारी लाईव्ह मुलाखत झाली. शिवसेनेच्या ‘भयमुक्ती’च्या नाऱ्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरील टीका केली.
व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.
ते म्हणाले, शहरात शिवसेनेसह कोणत्याच पक्षाकडे विकासाचे व्हीजन नाही. नगरसेवकांकडेही दृष्टी व इच्छाशक्ती नाही.
महापालिकेत विकासाचे मुद्दे मांडले तर टिंगल-टवाळी केली जाते. या सर्व बाबींचा कंटाळा आल्याने भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरली आहे. गेल्या १५ वर्षात महापालिकेने उत्पन्नाची साधने वाढवली नाहीत. शहरातील एकही चौक आणि कारंजा सुशोभित केला नाही. कंपन्या सुशोभिकरणासाठी तयार असताना हे काम होऊ दिले नाही. पालिकेकडे सक्षम अभियंतेच नाहीत.
शिवसेनेमुळेच उड्डाणपूल रखडला
केंद्र सरकारने जिल्ह्यातील महामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग केले. त्यामुळे उड्डाणपुलाचाही खर्च केंद्र सरकारच करणार आहे. मात्र महापालिकेत शिवसेनेने उड्डाणपुलासंबंधीच्या मान्यतेचा प्रस्ताव सहा महिने प्रलंबित ठेवला. महापालिकेच्या खर्चाचा वाटा राज्य सरकार देईल, असे सांगूनही सेनेने हे काम अडविले. तत्पूर्वी राष्टÑवादी व बबनराव पाचपुते यांनीही पुलाचा खेळखंडोबा केला.स्वत:च्या व्यवसायासाठी काही लोकांना हा पूलच नको आहे. आपण या पुलासाठी अडीच वर्षांपासून काम करीत असून त्यातील बहुतांशी अडथळे आता दूर झाले आहेत, असे गांधी म्हणाले. ‘पुलाचा व महापालिकेचा काही संबंध नाही, तो खासदारांनी करायला हवा होता’, या सुजय विखे यांच्या टीकेकडे लक्ष वेधले असता गांधी म्हणाले, पुलासाठी जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन कराव्या लागतात. त्यामुळे महापालिकेचा संबंध येतोच. विखे यांचे ज्ञान अर्धवट आहे. नगर-पुणे रेल्वेचाही प्रश्न लवकर सुटणार असून मुंबई-पुणेच्या धर्तीवर भविष्यात ‘नगर-पुणे’ रेल्वेगाडी धावेल, असे गांधी यांनी सांगितले. शहरात ३०० बेडचे रुग्णालय मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापौरपदाचा उमेदवार निकालानंतरच
सर्व पक्षांनी महापौर पदाचे उमेदवार जाहीर करावे, या सुजय विखे यांच्या मागणीकडे लक्ष वेधले असता गांधी म्हणाले, ‘थेट जनतेतून निवड असेल तर उमेदवार जाहीर केला जातो. येथे निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर निवडला जाणार आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याचा प्रश्नच नाही’. प्रत्येक नगरसेवकाची महापौर होण्याची इच्छा असते. त्यामध्ये सुवेंद्र गांधी यांचेही नाव असू शकेल. सुवेंद्र हा जसा मुलगा आहे, तसाच तो एक नगरसेवकही असेल. त्यामुळे त्यांनाही महापौर होण्याचा अधिकार आहे, असे गांधी म्हणाले. पंतप्रधानपदाचा विषय हा देशाचा असल्याने तिथे आधी उमेदवार जाहीर झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
राठोड सर्वात मोठे फिक्सर
या निवडणुकीत भाजप व दोन्ही कॉंग्रेसचे फिक्सिंग आहे, असा आरोप राठोड यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केला होता. याबाबत गांधी म्हणाले, २००८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ३३ जणांची गटनोंदणी केली असताना त्यांचे नगरसेवक राष्ट्रवादीला मिळाले. राठोड यांनीच त्यांना राष्ट्रवादीत पाठविले. राठोड यांच्या पाठिंब्यामुळेच अरुण जगताप नगराध्यक्ष झाले होते. राठोड यांनी गांधी मैदानात जगताप यांचे कौतुक केलेले आहे. आम्ही नव्हे राठोड हे सर्वात मोठे राजकीय फिक्सर आहेत.
मोदी-कोतकर यांचे फोटो अयोग्यच
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे केडगावात सोबत झळकत आहेत, याकडे लक्ष वेधले असता हे चुकीचे असून हे फोटो काढण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.