नगरचे ‘कास पठार’ रंगीबेरंगी फुलांनी फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:18 AM2019-09-15T11:18:29+5:302019-09-15T11:19:11+5:30

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे.

The city's 'Kas Plateau' was blooming with colorful flowers | नगरचे ‘कास पठार’ रंगीबेरंगी फुलांनी फुलले 

नगरचे ‘कास पठार’ रंगीबेरंगी फुलांनी फुलले 

योगेश गुंड 
अहमदनगर  : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे. येथील फुलांना देशभरातील बाजारातून मागणी असते.
नवरात्र उत्सव आणि दसरा, दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेरबरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास, पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा या ठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून या भागात फुलशेती केली जाते.
एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूजा  व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या यासारखे शेवंतीचे प्रकार आहेत. साधारण मार्च  महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस लांबल्याने फुलांच्या उत्पादनात ४० टक्के घटीची शक्यता आहे.
पावसावरच बाजारभावाचे गणित 
यंदा कमी  पावसामुळे झेंडू-शेवंती या फुलांचे उत्पादन कमी होई. आवक घटणार असून त्याचा परिणाम फुलांच्या भाववाढीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चार पटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव सध्या प्रती किलो २०० रूपये असला तरी सणासुदीत जास्त होईल, असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे.  झेंडू ७० रूपये प्रतिकिलो विकला जात आहे. चांगला पाऊस झाला तर ग्राहक व शेतकरी या दोघांना भाव परवडतील. पाऊस न झाल्यास  शेतक-यांची सगळी आर्थिक गणिते बिघडणार आहेत.
विकतचे पाणी घेऊन फुले जगविली
यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतक-यांनी पदरमोड करून टॅँकरने पाणी देऊन फुले जगविली. एक एकर फुल शेतीसाठी आम्ही विकतचे १० हजार लिटर पाणी घेऊन देत आहोत. आमच्याकडे शेवंतीची १० हजार रोपांची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिल्याने त्यातील ७ हजार रोपे आम्ही काढून टाकली. फुलांची वाढ चांगली झाल्याने आता पावसाची गरज आहे, असे अकोळनेरचे फूल उत्पादक तुळशीदास जाधव यांनी सांगितले. 
    

Web Title: The city's 'Kas Plateau' was blooming with colorful flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.