नगरच्या टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद!
By Admin | Published: June 27, 2016 12:51 AM2016-06-27T00:51:47+5:302016-06-27T00:59:14+5:30
अरुण वाघमोडे , अहमदनगर वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या या वाद्यांना आषाढी वारीनिमित्त मागणी वाढली असून, सध्या हे साहित्य खरेदी
अरुण वाघमोडे , अहमदनगर
वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या या वाद्यांना आषाढी वारीनिमित्त मागणी वाढली असून, सध्या हे साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी वारकऱ्यांची लगबग सुरू आहे़ पारंपरिक प्रकारात मोडणारी ही वाद्ये हातानेच बनविली जात असल्याने नगर शहरात अवघ्या दोन ते तीन ठिकाणीच विक्री व दुरुस्ती केली जाते़ शहरात थेट खानदेश व मराठवाडा येथील वारकरी ही वाद्ये खरेदीसाठी येत असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले़
आषाढी वारी जवळ आली की हरिनामाच्या गजरासह टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या, लेझीम यांचा सर्वत्र नाद घुमतो़ भजन व कीर्तनासाठी लागणाऱ्या वाद्यांची व्यवस्था केली जाते़ ही वाद्ये सहज उपलब्ध होत नसल्याने हस्तकलेत माहीर असलेल्या कारागिरांकडेच ती दुरुस्त केली जातात़ आषाढी एकादशी २० दिवसांवर येऊन ठेपल्याने या कारागिरांकडे सध्या वारकऱ्यांची गर्दी दिसत आहे़ पंढरीची वाट तुडविताना हरिनामाचा गजर करत दिंडी सोहळा पुढे सरकतो़ तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन सोहळा होतो, यासाठी या वाद्यांची गरज भासते़ आषाढी वारीला निघालेले खानदेश, मराठवाड्यातील बहुतांशी दिंडी सोहळे नगर शहरातून जातात़ येथे मुक्काम करून पुढे मार्गस्थ होतात़ यावेळी दिंडीमधील वारकऱ्यांकडून कीर्तन-भजनासाठी लागणाऱ्या वाद्यांची नगर येथून खरेदी केली जाते़ अनेक दिंडी सोहळ्यांमध्ये भजन, कीर्तनासह लेझीम, भारुड, गोंधळ यासह विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने यासाठी पारंपरिक वाद्याची गरज भासते़ हार्मोनियम, तबला, मृदुंग, वीणा, हलगी, ढोलकी आदी कच्चा माल आणून हाताने तयार केले जाते़ हे साहित्य तयार करणारे कारागीर नगरमध्ये अगदी कमी आहेत़ आषाढी वारी म्हणजे कारागीर आणि हे साहित्य विक्रेत्यांसाठी एक चांगली संधी असते़ गेल्या सात ते आठ दिवसांत जिल्ह्णात पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साह संचारला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे साहित्य विक्रेत्यांनी सांगितले़