चौंडीतील गोंधळ : ३५ जणांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:41 AM2018-06-05T10:41:54+5:302018-06-05T10:42:17+5:30
तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोकअहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला व पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. या प्रकरणी सुरेश ऊर्र्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम जि.उस्मानाबाद) यांच्यासह ३५ ते ४० आरोपींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे व इतर कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोकअहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला व पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. या प्रकरणी सुरेश ऊर्र्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम जि.उस्मानाबाद) यांच्यासह ३५ ते ४० आरोपींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे व इतर कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पाच पोलीस जखमी झाले होते. या सर्वांना कर्जतच्या न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. सोमवारी या आरोपींना जामखेड न्यायालयात आणले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली.
या आरोपींना न्यायालयात आणणार असल्यामुळे सोमवारी पाच ते सहा जिल्ह्यांतील धनगर समाजबांधव उपस्थित होते. त्यामुळे न्यायालय, तहसील व पोलीस ठाणे परिसराला गर्दीचे स्वरूप आले होते. होळकर जयंती कार्यक्रमात सुरेश कांबळे व डॉ. इंद्रकुमार भिसे, रवी देशमुख हे गोंधळ घालणार असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर या तिघांना ३० व ३१ मे रोजी जिल्हाबंदी करण्यात आली होती.
३१ मे रोजी दुपारी सभेच्या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास सुरेश ऊर्फ सूर्यकांत कांबळे हा ७० ते ८० कार्यकर्त्यांसह सभा मंडपात आला. सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सुरेश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली. पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांना पकडण्यात आले, अशी फिर्याद पोलिसांनी दाखल केली होती.