काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांत हाणामारी
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:39+5:302020-12-05T04:33:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर काँग्रेसच्या दोन गटांत बुधवारी सायंकाळी चांगलीच हणामारी झाली. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर काँग्रेसच्या दोन गटांत बुधवारी सायंकाळी चांगलीच हणामारी झाली. त्यामुळे या परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला.
काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली लालटाकी येथील पक्ष कार्यालयात दक्षिण नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दक्षिणेतील तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर तांबे यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक सायंकाळी संपली. बैठक संपल्यानंतर आमदार तांबे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी निघून गेले. ते गेल्यानंतर केडगाव येथील विशाल कळमकर व युवकचे शहराध्यक्ष मयूर पाटुळे यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हणामारीत झाले. यामध्ये काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कार्यकर्ते धाऊन आले. दरम्यान, गोंधळ सुरू होऊन बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन एकच गोंधळ उडाला होता. पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला.
..
पदाधिकाऱ्यांचे कानावर हात
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता साळुंके म्हणाले, पक्ष कार्यालयात आढावा बैठक होती. शहराचा आढावा सुरू झाल्याने आम्ही सर्व कार्यालयातून बाहेर पडलो. त्यानंतर काय झाले माहीत नाही. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.