उसाचे पैसे तत्काळ वर्ग करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:25 AM2021-09-17T04:25:38+5:302021-09-17T04:25:38+5:30
शेवगाव : जिल्ह्यातील कारखान्यांनी २०२०-२१ गळीत हंगामातील उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करावी, अन्यथा आंदोलन उभारू. गरज भासल्यास ...
शेवगाव : जिल्ह्यातील कारखान्यांनी २०२०-२१ गळीत हंगामातील उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करावी, अन्यथा आंदोलन उभारू. गरज भासल्यास प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर आर. व्ही. जोशी यांना बुधवारी दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे, अशोक भोसले, अमोल देवढे आदी उपस्थित होते.
मागील गळीत हंगामात विविध साखर कारखान्यांना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे. सद्यस्थितीत आगामी गळीत हंगामाची तयारीही सुरू झाली आहे. परंतु, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील गळीत हंगामातील उसाची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांना शेतीच्या पुढील नियोजनासाठी व घर खर्च, सोसायटी, बँक, सावकार असे विविध कर्ज, हात उसनी देणी असल्याने कारखान्याने उसाचे पैसे न दिल्याने व्याजाचा भुर्दंड पडला आहे. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे न मिळाल्याने मानसिक व आर्थिक हानी झालेली आहे. यास सर्वस्वी साखर प्रादेशिक सहसंचालक कार्यालय जबाबदार आहे. ऊस उत्पादक व साखर कारखाने यांच्यात समन्वयाची भूमिका ठेवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे युटेक शुगर, अगस्ती या कारखान्याने पैसै थकविले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.