अकाली निधन झालेल्या तरूणाच्या कुटुंबीयांना वर्गमित्रांनी दिला आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:24+5:302021-05-25T04:23:24+5:30
केडगाव : अवघ्या ३४ वर्षे वयाच्या तरुणाचे अकाली निधन झाले. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच वर्गमित्रांनी एकत्र ...
केडगाव : अवघ्या ३४ वर्षे वयाच्या तरुणाचे अकाली निधन झाले. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच वर्गमित्रांनी एकत्र येत अकाली निधन झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या २ दिवसांत ८० हजार रुपये जमा करत मयत वर्गमित्राच्या दोन्ही लहान मुलांच्या नावावर पोस्टात ठेव पावत्या करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सारोळा कासार (ता. नगर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि २००१ साली दहावीची परीक्षा दिलेल्या वर्गमित्रांनी ३-४ वर्षांपूर्वी एक व्हाॅट्सॲप ग्रुप बनविलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गमित्र एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असतात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. या ग्रुपमधील सचिन पांडुरंग चारुडे (वय ३४, रा. अस्तगाव, ता. पारनेर) याचे ६ मे रोजी अल्प आजाराने अकाली निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. ही घटना के. बी. पी. व्ही. २००१ ग्रुपला समजताच प्रत्येकजण हळहळला. मात्र, या दु:खातून सावरत वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्गमित्रांना मदतीसाठी आवाहन केले. अवघ्या २ दिवसांत ८० हजारांचा मदतनिधी जमा झाला. या पैशांतून मयत वर्गमित्राच्या दोन्ही लहान मुलांच्या नावे पोस्टात प्रत्येकी ४० हजारांच्या ठेव पावत्या करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमासाठी साध्वी शोभा कवडे, सविता वराळे, सविता पुंड, सोमनाथ झेंडे, विजय देवखुळे, सुनील देवखुळे, संदीप कडूस आदींनी परिश्रम घेतले.